Madhu Deshmukh

madhuतिची कथाच वेगळी: मधू देशमुख

तोडी थाटातील ‘राग मधुवंती’ हा एक मधाळ राग आहे. या रागाशी निव्वळ नावापुरतं नातं न सांगणारी ‘मधुवंती देशमुख’ बोलायला तशीच गोड. अटलांटात राहून पंडित प्रीतम भट्टाचार्य यांच्याकडे ती शास्त्रीय संगीत शिकते. सुरांच्या धुंदीत रमली असती तर गायिका म्हणून आज आपल्यापुढे सादर झाली असती परंतु ज्या काळात ‘समाजसेविका’ म्हंटलं की डोळ्यापुढे उभी राहायची ती खांद्यावर झोळी लटकवलेली, केसांचा घट्ट अंबाडा घातलेली, सुती साडी नेसणारी एक करारी स्त्री (शबाना आझमी किंवा स्मिता पाटील!), त्या काळात १०-१२वीत चांगले गुण मिळूनही ध्येयवाद व महत्वाकांक्षा दोन्हीने प्रेरित होऊन समाजसेवा हा विषय अभ्यासासाठी तिने निवडला आणि “याने का पोट भरणार” या टोमण्याकडे दुर्लक्ष करून तिने TISS (Tata Institute of Social Science) ची वाट धरली. ती वाढली दिल्लीत परंतू आईवडील तिच्याशी मराठी बोलत, ती सार्वजनिक गणेशोत्सवात मराठी नाटकात भाग घेत असे त्यामुळे महाराष्ट्राबाहेर राहून देखील ती मराठी सहजी बोलते. वडील स्त्रीशिक्षणाचे भोक्ते होते पण केवळ प्रोत्साहन देऊन थांबले नाहीत तर समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे ही जाणीव त्यांनी तिच्यात रुजवली.

तिच्याविषयी थोडेफार ऐकून होते पण डोळ्यासमोर अजूनही म्युनिसिपाल्टीच्या शाळेत शिकवणारी स्त्री दिसत होती, “शिक्षण संपल्यावर पुढे काय केलंस?” तिच्या पहिल्या उत्तरातच मला धक्का बसला आणि डोळ्यावरची पांढरपेशी झापड उडाली. स्त्रिया व बालक आरोग्य ( reproductive health for women, child development)! बाळंतपणात मातांचे कुपोषण होते आणि आयांबरोबर बाळांची तब्ब्येत देखील लहान वयात बिघडते, हे गरीब (जगभर) समाजात दिसणारे दृश्य आहे. खरं तर निव्वळ गरीबी हे कारण नाही, अज्ञान व स्त्रीत्व आणि पुरुषत्व यांविषयीच्या चुकीच्या कल्पना यामुळे हे प्रश्न अधिक भेडसावतात. गर्भवती पत्नीची शारीरिक व मानसिक परिस्थिती जाणून घेऊन तिला मदत करणे तर दूरच पण “आमची नाही का ४ बाळंतपणं झाली” किंवा “इतर बायका असले नखरे करत नाहीत” हे सासू किंवा नवऱ्याकडून ऐकावे लागते. याशिवाय पत्नीबरोबर डॉक्टरकडे जाणं, तिच्या आरोग्याकडे जातीने लक्ष देणं हे पुरुषार्थाच्या व्याख्येत बसत नाही. याला उपाय काय? दान केलेल्या पैश्याचं पाठबळ मिळालं तर औषधं पुरवता येतील, वेळप्रसंगी एखादा/दी कनवाळू डॉक्टर विनामूल्य तपासेल पण स्त्री तिथे पोचलीच नाही, तिला औषधाची गरज आहे हे तिच्या कुटुंबाला पटलंच नाही तर काय करायचं? समाजसेवी संस्थेला आपण दान म्हणून चेक लिहून देतो तेंव्हा हा विचार फारसा करत नाही पण मधूने हा मुद्दा मांडला आणि मी निरुत्तरित झाले.

याच सुमारास भारतात HIV/एड्स चा पहिला रुग्ण “उघडकीस” आला होता. देशभर खळभळ उडाली, या रोगाविषयी नाही नाही ते प्रवाद व रोग्यांच्या चारित्र्याविषयी नको त्या शंका घेतल्या जाऊ लागल्या. समाजातील अज्ञान व नीतिमत्तेचा खोटा बुरखा यामुळे उपचार ना मिळता रोगी हकनाक बळी जात होते; शिवाय समाजात अवहेलना होत होतीच. या परिस्थितीत प्रस्थापित समाजातील मुलीच काय मुलगेसुद्धा धरणार नाहीत अशी वाट मधूने धरली, AIDS प्रतिबंधनाच्या कार्याला स्वत:ला वाहून घेतले. अर्थात रोगावर औषध मिळून हा प्रश्न सुटत नाही, रोगाचे मूळ शोधावे लागते.

“जर सामान्य माणूस या रोगासाठी एक पैश्याची मदत सोड, एक क्षण विचार सुद्धा करू इच्छित नाही तर जनजागृती होणार कशी?”
“सुरुवातीला भाषणं, पथनाट्य व workshop या मार्गांनी लोकांचं लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न केला पण हे प्रश्न सहजासहजी सुटत नाहीत, सामाजिक पातळीवर जसं प्रयत्नशील असावं लागत तसं शासकीय पातळीवरही. Social reform should start at the community level: slums, red light areas… but that is not enough. You have to fight this at the policy level.”

बिल गेट्स संस्थेने भारतात या कार्याला मुक्त हस्ताने दान दिले आहे, आर्थिक पाठिंबा तसेच पुरुषांना काँडम (निरोध) वाटण्यापर्यंत. तरीही असं का घडतं? दवाखाने संध्याकाळ ते रात्री उशिरापर्यंत उघडे असतात तरीही स्त्रियांची ही अवस्था का?

“You have to understand their context. हा केवळ एक स्त्रीचा निर्णय होत नाही. संध्याकाळी ती संसार, स्वयंपाक यात व्यस्त असते. डॉक्टरकडे जाणे तिला व तिच्या कुटुंबियांना सोयीचे किंवा महत्वाचे वाटत नाही. निरोध वापरणे तिच्या नवऱ्याला पुरुषार्थाचा अपमान वाटतो. अशा वेळी त्याला आंजारून गोंजारून, ‘यातच तुझी खरी मर्दानगी आहे हे सांगून’ त्याला वश करून घ्यावे लागते.”

शहरात चालत असताना एका विशिष्ट ठिकाणी आपण आलो की शहराच्या हवेतले रंग आणि वास बदलू लागतात. पाच मिनिटावर असणाऱ्या आपल्या ‘सदाशिव पेठी संस्कृतीपेक्षा’ वेगळे. गजरेवाले, भेळवाले, अत्तरे विकणारी दुकाने, त्या तसल्या फिल्म दाखवणारे टॉकीज, उकडलेली अंडी विकणारे फेरीवाले. तो भाग जवळ येऊ लागला की आपण झपाझप चालू लागतो. तिथे उभ्या असलेल्या स्त्रिया. रस्त्याच्या दुतर्फा. तोंड भडक रंगवलेल्या. फार भेसूर आणि भयंकर काहीतरी वाटत असे. मधूने या स्त्रियांची व्यथा जाणून त्यांच्यासाठी कष्ट घ्यायला सुरुवात केली. “लाल बत्ती” ह्या व्यवसायाचे निर्मूलन होणे नाही परंतू अशा स्त्रियांना पांढरपेशा समाजात पुन्हा प्रवेश मिळेल की नाही? वेश्या सोडा पण वेश्यांच्या निरागस मुलांना सुद्धा आपण मुख्य प्रवाहात सामील करू शकत नाही. कारण फक्त इच्छा आहे किंवा नाही असं नाही, पण ‘आपली संस्कृती आपला समाज’ या सगळ्या गोष्टींची जास्त भीती वाटते, त्याचा विचार आपण जास्त करतो.

“नारीशक्ती, स्त्रीमुक्ती, Women’s Empowerment” …हे शब्द व्यासपीठावर किंवा कथेत चांगले भारदस्त वाटतात. वस्तुस्थिती खूप भयंकर आहे. भाषणं देऊन मतपरिवर्तन होत नाही, पीडित स्त्रियांना स्वातंत्र्य व स्वावलंबनाचे मार्ग मोकळे करून द्यावे लागतात. एका संस्थेतर्फे “drop-in centers” (सहाय्यता केंद्र) प्रस्थपित केली, ज्यायोगे गरजू स्त्रिया एकट्या येऊन मदत घेऊ शकतील.

तसं मधूच्या कारकिर्दीचा आवाका बराच मोठा आहे. मुंबई, बिहार, कलकत्ता, आफ्रिका व आता अमेरिका या भागात तिने तंत्रज्ञान, निधी गोळा करणं, अनेक वस्तीत स्त्रिया व पुरुष यांच्याशी त्यांना समजेल अशा भाषेत थोडं जागं करणं अशा अनेक कठीण, आव्हानात्मक व चाकोरीबाहेरच्या भूमिका बजावल्या आहेत.

मुलाखत घेऊन बरेच महिने झाले. तिच्या कार्याबद्दल बोलताना लिहून घेतलेले काही शब्द ठळक दिसत होते NGO, UNICEF, HIV/AIDS, NACO, WHO, Empowerment, Sex Worker, Focussed Intervention, Collectivization ….आणि न लिहिलेले शब्द अधिक अस्वस्थ करत होते. एकीकडून ‘मधू देशमुख’ हे नाव प्रकाशझोतात आणले पाहिजे हे कळत होते तर दुसरीकडे या प्रश्नांना वाचा फोडून सुखवस्तू समाजाला जागं केलं पाहिजे हे जाणवत होते. मधूचे आदर्श बाबा आमटे, अभय बंग, डॉ. अनिल अवचट यांनी ‘the road not taken ‘ निवडून मार्गक्रमण केले. तिच्याशी बोलताना मला स्वतःचा नाकर्तेपणा जाणवू लागला.

बऱ्याच मुलाखती संपताना, “पुढे काय?” हा साचेबंद प्रश्न विचारता येतो, इथे हा सवाल उद्भवतच नाही कारण स्त्रियांवर होणारे अत्याचार जोपर्यंत संपत नाहीत तोपर्यंत एकच काय अनेक ‘मधू देशमुख’ समाजाला लागणार आहेत. तिला लढा द्यायला बळ मिळू दे, साथ द्यायला समाज पुढे येऊ दे आणि लढतीच्या कारणांचा नाश होऊ दे …….

‘तमसो मा ज्योतिर्गमय’
(Madhu Deshmukh: https://www.icrw.org/)