'Rungmunch' Presents 'Geet Raamaayan - An Epic Musical Journey' at BMM 2017

“अजाणतेपणी केंव्हा माता घाली बाळगुटी
बीज धर्माच्या द्रुमाचे कण कण गेले पोटी

छंद जाणतेपणीचा, तीर्थे काव्याची धुंडिली

कोण्या एका भाग्यवेळी पूजा रामाची मांडली

देव वाणीतले ओज शीतळले माझ्या ओठी

वाल्मिकीच्या भास्कराचे होई चांदणे मराठी

झंकारती कंठ वीणा, येती चांदण्याला सूर

भाव माधुर्याला येई, महाराष्ट्री महापूर

चंद्र भारल्या जीवाला, नाही कशाचीच चाड

मला कशाला मोजता, मी तो भारलेले झाड

अशी भारलेली मंत्रमुग्ध अवस्था बे एरियातील रसिकांनी गेल्या वर्षी अनुभवली.
ज्याने गीत रामायण ऐकले नाही असा मराठी माणूस मिळणे अतिशयच विरळा. १९५५ पासून आता पर्यंत किमान पाच पिढ्या तरी गीत रामायणाची गाणी ऐकत मोठ्या झाल्या. गीत रामायण हा एकाच कवीने वर्षभर रचलेला, एकाच संगीतकाराने संगीतबद्ध केलेला, वर्षभर अखंडितपणे चाललेला आकाशवाणीच्या इतिहासातील एकमेव, अभूतपूर्व असा संगीत कार्यक्रम ठरला. आणि आता हेच गीत-रामायण फक्त ऐकायलाच नव्हे तर पाहायलाही मिळणार आहे.
गीत-रामायणावर आधारित “गीत-रामायण : नृत्य नाटिका” हा अत्यंत दिमाखदार, देखणा आणि नयनमनोहर असा हा कार्यक्रम आता बृहन महाराष्ट्र मंडळाच्या २०१७ सालच्या ग्रँड रॅपिड्स येथल्या अधिवेशनात होत आहे. अनेक तांत्रिक करामती, देखणे नेपथ्य, कल्पक रंगभूषा आणि वेशभूषा तसेच अनेक गुणी गायक-वादकांनी चढवलेला स्वरसाज आणि त्याला अत्यंत अनुरूप आणि डौलदार नृत्यांची आणि अभिनयाची साथ यांनी हा कार्यक्रम एक वेगळ्याच प्रकारची अनुभूती देतो. या नृत्यनाटिकेत रंगमंचावर रामायणातल्या ८० पेक्षा अधिक व्यक्तिरेखा साकार करण्यात आलेल्या आहेत.
“बाबुजीच्या गीत-रामायणाने आमचे कान तृप्त केले, तुमच्या गीत-रामायणाने आमचे डोळेही तृप्त केले.”, “गीत रामायणाची एकसष्ठी झाली परंतु भारतातही इतक्या मोठ्या तोलामोलाचा कार्यक्रम तोही अशा प्रकारे करण्याचा विचारही कोणाच्या मनातही आला नाही” अशा प्रकारचे अनेक अभिप्राय आम्हाला मिळाले. तेव्हा बृहन महाराष्ट्र मंडळाच्या २०१७ सालच्या अधिवेशनातला हा कार्यक्रम नक्की बघायला या.”

धन्यवाद,
माधव कऱ्हाडे (Director)